Monday, December 10, 2007

माझ्या लैंगीक अनुभूती

पन्हाळा ते विशाळगड चालत जाण्याचा मनसूबा जेव्हा मी मित्राकडे प्रकट केला तेहा त्याची प्रतिक्रिया "बोर मारू नको" अशी होती. आता चार मजले चढताना माझा चेहरा जरी थोडासा काळानिळा पडत असला तरी ह्यात अविश्वसनीय काय आहे ते कळत नव्हतं. दुसर्या एका अनुभवी मित्राला [ तीनदा सिंहगड बाईकवर, लोहगड-विसापूर आणि पर्वती] फोन लावला, "ट्रेक ला चाललोय,पन्हाळा-विशाळगड, काय करू"असं विचारल्यावर "सोडून दे" असा मोलाचा सल्ला मिळाला.एकुणच आप्तेष्टांमधे एवढं उत्साही वातावरण असताना मला मात्र हे ८० किलोमीटर [किंवा ७०, किंवा साडे एक्क्याण्णव. शेवटपर्यंत आमचे ह्या अंतावर तर्क चालू होते. ] सहज पार करू शकू असा दुर्दम्य विश्वास होता, आणि कालावधी तीन दिवसांचा असल्यामुळे विशेष प्रॉब्लेम नव्हता.

चालण्याच्या बाबतीत मी पुण्यातल्या एक विशिष्ट पेठेतील लोक पत्ता सांगण्याच्या बाबतीत जेव्हढे उत्साही असतात तेव्हढा उत्साही असलो तरी चिंता चालण्याची नव्हती.माझ्यासमोर क्रायसीस होता, तो एस.टी. प्रवासाचा.एस.टी आणि माझा जुना ऋणानुबंध आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आजवरच्या प्रवासात माझा मोठा तोंडभार लागलेला आहे, त्यामुळे "आपण असं करू, मस्त ट्रेननी जाऊ"हा माझा शेवटचा प्रयत्नही तुषारनी "थोबाड बंद कर" म्हणून हाणून पाडला आणि मी आवळा सुपारी, तूप आणि दगडफूल ह्यांचे मिश्रण वगैरे गोष्टी बॅगेत टाकल्या.

फीफा, टेस्ट सीरीज आणि एफ-वन फायनल राऊंड ह्या सर्वांवर तुळशीपत्र ठेवून आम्ही एशियाड मध्ये बसलो[बेटर ऑप्शन], तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजले होते. प्रवासाचा वेळ गळणार्या टपामुळे मोठा मजेत गेला. कोल्हापूरला प्रत्येकी दोन कप चहा आणि तीन प्लेट पोहे असा मिताहार झाल्यानंतर "पन्हाळ्याला जायला कोणती एस.टी. लागेल, मोरवाडी का जांबवणी" ह्यावर छोटासा परीसंवाद झाला आणी शेवटी सगळे "कोल्हापूर-पन्हाळा पायथा" लाल डब्यात बसले.

किल्ल्यावर्चं आय. टी. आय. कॉलेज, मोबाईल टॉवर्स, आणि कुठलीशी स्वपांना उभारी इत्यादी देणारी बॅंक वगैरे ऐतिहासिक वास्तू पाहून आणि पुराव्यांसाठी फोटो काढून विरुद्ध दिशेनं पन्हाळा उतरलो आणी चालाचाली सुरू केली. कोल्हापूर्ला उतरल्यापासून पावसानी हुलकावणी दिली होती. रणरणत्या उन्हात एक कातील चढण चढोन मसईच्या पठारावर आलो तेव्हा जरा बरं वाटलं. क्षितीजापर्यंत दिसणारं हिरवंगार पठार पाहून मन प्रसन्न वगैरे झालं पण पण पुढच्या दिड तासात त्या पठारानी अक्षरश: जीव काढला. "अरे अजून किती चालायचंय" हा प्रश्न आम्ही किमान अडिच्शे वेळा तरी विचारला असेल. नजरेच्या टप्प्यात फक्त पठार आणि मधून मधून चुकार झुडपं. रस्त्यात एका गाववाल्यानी["चला बीरूबाला पाच रुपाय ववळनी टाका"] नीलगिरीच्या झाडाची खूण सांगितली होती,तेही दिसाय्ला तयार नव्हतं.ऊन तर डोक्यात गेलं होतं पार.तिकडे जरा एक बर्यापैकी जागा पाहून जेवण उरकलं आणी भारतीय दंडविधानात, बलात्काराच्या गुन्हेगाराला पन्हाळा विशाळगड ट्रेक करायची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात यावी वगैरे ठराव पास केले.
-X-

एक दिड दोन वर्षांपूर्वी आम्ही सहा जण पन्हाळा विशाळगड गेलो होतो. परत आल्यावर केलेलं हे पांढर्यावर काळं. नेहमीप्रमणे अर्धवट आहे आणि आपण To be Continued..वगैरे फालतूगिरी करत नाही.
बाकी, Titleचा आणि Contentचा काही संबंध नाही हे सांगणे नलगे. आंबटशौकीनांना धन्यवाद.

9 comments:

Unknown said...

sahich!!!
pan purn anubhav lihava hi vinanti.

Prachi said...
This comment has been removed by the author.
मोरपीस said...

तुमचा हा अनुभव मस्त आहे आणि खास शैलीत आपण तो मांडलेला आहे.

Samata said...

foreplay stimulates!!!.....orgasm is awaited...

Menaka

Amogh said...

c'mon u cant leave us like that!!

विक्रम एक शांत वादळ said...

awasome experience

ज्ञानेश said...

केवळ अप्रतिम.

पायातल्या असंख्य गोळ्यांची आठवण झाली.

सौरभ said...

hahahahaha... jabri :D

Anonymous said...
This comment has been removed by the author.